नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून 'करतारपूर साहिब गुरुद्वारा'ची तिकीटविक्री बंद करण्यात आली आहे. तसेच, भाविकांना याठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. १६ मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त या कॉरिडोअरचे उद्घाटन करण्यात आले होते. ४.७ किलोमीटरचा हा मार्ग पाकिस्तानातील पंजाबमधील डेरा बाबा नानक मंदिरात शीख भाविकांना जाता यावे, यासाठी तयार करण्यात आला आहे. नऊ नोव्हेंबरला उद्घाटन झाल्यानंतर यासाठी पाकिस्तान आकारत असलेल्या तिकिटावरून बऱ्याच वेळा वादही निर्माण झाले होते. मात्र, पहिल्यांदाच हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र न जमण्याचे आवाहन केले आहे. तसेच बऱ्याच राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच सिनेमागृहे आणि मॉल्स बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत १२ राज्यांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.
हेही वाचा : 'योग अन् आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो'