बंगळुरू - केंद्रीय गृहमंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कर्नाटकातील भटकळ गावातील दोघा भावांचा समावेश आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) पोलिसांनी ही यादी जाहीर केली आहे.
यूएपीए कायद्यात मागील वर्षी सुधारणा
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली होती. नव्या बदलानुसार एखाद्या व्यक्तीसही दहशतवादी घोषित करता येते. त्याआधी फक्त दहशतवादी संघटना आणि त्यातील सदस्यांचा दहशतवादी यादीत समावेश करता येत असे.
पाकिस्तानात लपल्याचा संशय
गृह मंत्रालयाने नव्याने १८ दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कर्नाटकातील रियाझ भटकळ आणि इकबाल भटकळ या दोघा भावांचा समावेश आहे. कर्नाटकातील भटकळ गावात त्यांनी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानात लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडवण्यात त्यांचा हात आहे. दहशतवाद्यांची गय केली जाणार नसल्याचेही गृह मंत्रालयाने अधिकृत पत्रकात म्हटले आहे.