बेंगळूरू - लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच कर्नाटक सरकारने मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडीयुरप्पा यांनी गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील लोकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात येण्यास प्रवेश नाकारला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्यण घेण्यात आला असून नव्या गाइडलाइन्स येईपर्यंत यावर कायम राहण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र राज्यांतर्गत वाहतूक सुरू राहणार आहे. तसेच परिवहनच्या बसेस आणि खासगी बसेस देखील रस्त्यावर धावणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले. कन्टेन्मेंट झोनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन करण्यात येणार असून अन्य झोन्समध्ये आर्थिक व्यवहार सुरू राहणार आहेत. तसेच रविवारी संपूर्ण राज्यात कडक संचारबंदीची अंमलबजावणी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या काळात होम क्वारंटाईनवर अधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी झोननुसार शिथिलता देण्यात आली. याचप्रकारे चौथ्या टप्प्यात देखील दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच राज्यांतर्गत रेल्वेसेवा पूर्ववत होणार असल्याचे ते म्हणाले.
कालच लॉकडाऊन-३.० ची मुदत संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली, ३१ मेपर्यंत वाढवण्यात आलेल्या या कालावधीत राज्यांच्या सोयीनुसार त्यांनी शिथिलता देण्यास सांगण्यात आले. यामध्ये ग्रीन, ऑरेंज तसेच रेड झोन मधील व्यवहारांचे राज्य सरकार नियमन करणार आहे.