मुंबई - कर्नाटकचे बंडखोर आमदार आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांविरोधात अपमानकारक घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांनी दाखल केलेल्या याआधीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतरच्या काळात काँग्रेसमधील मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद आणि इतर काही जणांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे या बंडखोर आमदारांनी म्हटले आहे.
सर्व बंडखोर आमदार सध्या रेनिसन्स हॉटेल, पवई येथे राहात आहे. त्यांनी ववईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काँग्रेसकडून मिळणाऱ्या धमक्यांविषयी पत्र लिहून कळवले आहे. यात मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद यांची नावे नमूद केली आहेत. तसेच, या पत्राद्वारे संरक्षणाची मागणीही केली आहे. कर्नाटक किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेस नेत्याला भेटण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
या पत्रात शिवसाम हेब्बर, बी. सी. पाटील, महेश के., विश्वनाथ, मुनीरत्नम, नारायण गौडा, आर. शंकर, एच. नागेश, प्रताप पाटील, गोपालय्या, रमेश जे., एमटीबी नागराज, सोमशेखर आणि बसवराज या नेत्यांनी या पत्रात स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
१२ जुलैला सर्व बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, अध्यक्षांनी हे राजीनामे अद्याप स्वीकारलेले नाहीत. तसेच, आमदारांना अपात्रही ठरवलेले नाही. राजीनामे स्वीकारले जावेत, यासाठी या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने १६ जुलैपर्यंत हा निर्णय राखून ठेवला होता. आता राजीनामे स्वीकारले जावेत, यासाठी हे आमदार पुन्हा न्यायालयात जाणार आहेत.