बंगळुरु- कर्नाटकात विधानसभेच्या १५ रिक्त जागांसाठी आज (गुरुवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६६.२५ टक्के मतदान झाले आहे. ही निवडणूक भाजप तसेच काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर(जेडीएस) पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांवरून भाजपच्या बी. एस येडीयुरप्पा सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
बंडखोरी केलेल्या १५ आमदरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस व जेडीएसच्या १७ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ राज्यात आली. या पोटनिवडणुकीवर भाजपचे राज्यातील भविष्य अवलंबून आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत आपली शक्ती पणाला लावली होती.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने हयगय केली नाही. एकीकडे भाजप स्थिर सरकार चालण्यासाठी मतदान मागत आहे. तर काँग्रेस आणि जनता दलाने (सेक्युलर) सरकार पाडणाऱ्या त्या बंडखोर उमेदवारांना पराभूत करण्याची गळ घातली आहे. विशेष म्हणजे सगळे बंडखोर सत्ताधारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.