बंगळुरू - कर्नाटक पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर होती. एकूण ५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १५ जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १६५ जणांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये १२६ अपक्ष तर ९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
याआधी स्क्रुटीनी समितीने एकूण उमेदवारांपैकी ३० जणांचे एकूण ५४ अर्ज बाद ठरवले होते. त्यामुळे, केवळ २१८ जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक होते. त्यापैकी ५३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मैसूर जिल्ह्यातील हंसूरमधून सर्वाधिक (११) अर्ज मागे घेण्यात आले आहेत. तर बेळगावी जिल्ह्यातील गोकक, मंड्या जिल्ह्यातील यशवंतरपुरा आणि के. आर. पेटे या मतदारसंघातून एकही अर्ज मागे घेण्यात आला नाही. बंगळुरू मध्यच्या शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक (१९), तर उत्तर कन्नडा जिल्ह्याच्या यल्लापूर मतदारसंघात सर्वात कमी (७) उमेदवार आहेत.
सध्या सत्तेत असलेली भाजप, आणि विरोधी पक्षात असलेली काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे सर्व १५ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.
कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात, असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व आमदार भाजपकडून निवडणूक लढणार आहेत. या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होईल, तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.
हेही वाचा : कर्नाटक पोटनिवडणूक : अपात्र उमेदवारांना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा - सिद्धरामय्या