बंगळुरू - कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे विद्यमान सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. या धर्तीवर आज भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार विधानसभेत उपस्थित राहिले.
कर्नाटकातील परिस्थितीवर लोकसभा बिझनेस अॅडव्हायजरीची बैठक पार पडली. बैठकीत कर्नाटकात सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची तारिख निश्चित करण्यात आली. यानुसार, १८ जुलैला (गुरुवारी) अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.
भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत विद्यमान सरकारकडे बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते येडियुरप्पा आणि अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे काँग्रेस नेता डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही विधानसभा अध्यक्षांसोबत बंडखोर आमदारांचे राजीनामे फेटाळण्याबाबत चर्चा केली.
बहुमत सिद्ध करण्यापूर्वी मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा दिलेल्या आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, भाजपने आज बहुमत सिद्ध करा किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, अशी मागणी केलेली आहे.
बंडखोर आमदार आज सर्वोच्च न्यायालयात
१२ जुलैला सर्व बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, अध्यक्षांनी हे राजीनामे अद्याप स्वीकारलेले नाहीत. तसेच, आमदारांना अपात्रही ठरवलेले नाही. राजीनामे स्वीकारले जावेत, यासाठी या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने १६ जुलैपर्यंत हा निर्णय राखून ठेवला होता. आता राजीनामे स्वीकारले जावेत, यासाठी हे आमदार आज (सोमवारी) पुन्हा न्यायालयात जाणार आहेत.