नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या शाहरूख या तरुणाच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ३ मार्चला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील शामली येथून अटक केले होते. आज कडकडडुमा न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : केरळच्या 'त्या' वृत्त वाहिन्यांवरील बंदी हटवली
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावेळी शाहरुखने दिपक दहिया या पोलीस जवानावर बंदूक रोखली होती. तसेच आठ वेळा जमावावर गोळीबार केला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त केली होती.
हेही वाचा -दिल्ली हिंसाचार: पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखला उत्तरप्रदेशातून अटक
शाहरुखला २५ फेब्रुवारीला अटक केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त फेटाळले होते. हिंसाचार निवळल्यानंतर विशेष तपास पथकासह दिल्ली गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. त्यानुसार शाहरुखला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.