नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दुर्गम दऱयाखोऱ्यात दडलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला. या युद्धामध्ये भारताच्या वीर जवानांनी असामान्य असं शोर्य गाजवलं. या युद्धात अनेकांना विरमरण आलं, तर अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. कारगिल युद्धामध्ये शत्रुवर सर्वप्रथम गोळी आणि हात बॉम्बने हल्ला लान्स नायक सतवीर सिंह यांनी केला होता.
सतवीर सिंह हे दिल्लीतील मखमेलपूर येथील रहिवासी आहेत. कारगिल युद्धामध्ये त्यांची तुकडी शत्रुशी दोन हात करत होती. मात्र, युद्धादरम्यान गोळी लागल्याने ते जखमी झाले. लष्करी रुग्णालयामध्ये त्यांनी दीड वर्ष उपचार घेतले. मात्र, पायामध्ये अजूनही गोळी राहीली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरकारने मदत करण्याऐवजी उपेक्षा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पायाला गोळी लागल्याने सतवीर सिंग अपंग झाले. त्यांना काठीचा सहारा घेवून चालावे लागते. सरकारनं त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र, दिलेलं आश्वासनं अजूनही पुर्ण केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निवृत्त झाल्यानंतर सरकारने त्यांना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यापैकी त्यांना काहीही देण्यात देण्यात आले नाही. अंपग असल्याने त्यांना कामही करता येत नव्हते. प्रसंगी त्यांनी मोलमजूरी केली. सरकार दरबारी सतवीर यांनी अनेक हेलपाटे मारले. मात्र, त्यांना कोणी मदत केली नाही.
पाठपुरावा केल्यानंतर सरकारने त्यांना एक एकर जमीन दिली. मात्र ६ वर्षानंतर ती पुन्हा माघारी घेतली. त्यांना पुर्ण पेन्शनही देण्यात आली नाही. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर पेन्शन सुरु झाली. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सतवीर यांनी म्हटले आहे.
तोलोलिंग शिखरावर युद्धाचा थरार...
लान्स नायक सतवीर सिंग यांची तुकडी तोलोलिंग पहाडीत बंकरमध्ये दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा सामना करण्यासाठी गेले होते. यावेळी ९ जणांच्या टोळीचे ते नेतृत्व करत होते. सतबीर यांनी सर्व प्रथम शत्रुच्या ठिकाणांवर बंदूक आणि हात बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर घमासान युद्ध झाले. यावेळी सतबीर यांच्या पायाला शत्रुच्या बंदूकीतून निघालेल्या दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी पायाला चाटून गेली तर दुसरी पायामध्ये घुसली.
गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत ते जागेवरच पडले. शत्रुचे सैनिक जवळच असल्याने त्यांना माघारी आणण्यात लष्कराला अपयश येत होते. अनेक वेळा हेलिकॉप्टर त्यांना आणण्यासाठी आले, मात्र, गोळीबार सुरु असल्याने खाली न उतरताच माघारी जायचे. काही काळानंतर इतर सैनिकांनी त्यांना हवाई तळाजवळ आणले. तेथून उपचार करण्यासाठी सतवीर यांना रुग्णालयात हलवले.