हल्द्वानी - उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखले जातेच, मात्र येथील सैनिकांच्या शौर्य आणि साहसामुळे याला वीरभूमी म्हणून देखील ओळखले जाते. देशाच्या सन्मानासाठी येथील सुपुत्रांनी वेळोवेळी आपली देशभक्ती सिद्ध केली आहे. कारगिलच्या युद्धातील आपल्या सैनिकांच्या शौर्याला तर पूर्ण देश साक्षी आहे.
या महासंग्रामात भारतमातेच्या ७५ वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन तिरंग्याची ताकद संपूर्ण जगात कायम ठेवली होती. या वीरांपैकीच एक म्हणजे, शहीद मोहन सिंह. हल्द्वानीच्या नवाबी रोडवर नागा रेजीमेंटच्या शहीद मोहन सिंह यांचे कुटुंब राहते. आजही शहीद मोहन यांची वीरगाथा सांगताना शहीद मोहन यांच्या पत्नी उमा देवी यांचे डोळे पाणावतात.
७ जुलै १९९९ रोजी मिळाली होती शहीद झाल्याची बातमी:
कारगिल युद्धादरम्यान ७ जुलै १९९९ रोजी उमा देवी यांना, त्यांचे पती मोहन सिंह युद्धात शहीद झाल्याची दु:खद वार्ता समजली. कालांतराने सरकारने मोहन सिंह यांना त्यांच्या साहसाबद्दल मरणोत्तर सन्मानित केले होते.
टायगर हिल वर झाली होती नियुक्ती:
मूळच्या बागेश्वरमधील कर्मी गावचे रहिवासी असलेल्या मोहन सिंह यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरच्या जम्मू पोस्टवर झाली होती. कारगिल युद्धादरम्यान त्यांच्या नागा रेजीमेंटने २५ लोकांना टायगर हिल वर पाठवले होते.
३ घुसखोरांना घातले कंठस्नान:
टायगर हिल वर आपल्या शौर्याची प्रचिती देत मोहन सिंह यांनी ३ पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले होते. मात्र या चकमकीतच एक गोळी लागून ते शहीद झाले.
टायगर हिल वर जाण्यापूर्वी झाले होते शेवटचे बोलणे:
उमा देवी सांगतात, की मोहन सिंह टायगर हिल वर जाण्याआधी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. आपण युद्धासाठी कारगिलला जात आहोत, आणि तेथून आल्यावरच आता बोलणे होईल, असे मोहन सिंह यांनी म्हटले होते. मात्र नंतर थेट ते शहीद झाल्याची वार्ता मिळाली. हे सांगताना उमा देवी यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दोन्ही मुले आहेत बेरोजगार:
शहीद मोहन सिंह यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले बेरोजगार आहेत. या मुलांना रोजगार मिळवून द्यावा, एवढीच या कुटुंबाची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी आहे.