कानपूर – गुंड विकास दुबेने 8 पोलिसांना ठार केल्याच्या कानपूरमधील प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. पोलिसांमधील काही घरभेदी पोलिसांनी गुंड दुबेला माहिती पुरविल्याचे चित्र समोर येत आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित केले आहे.
कानपूरजवळील गावात गुंड विकास दुबे याने गोळ्या घालून 8 पोलिसांना ठार केले. यामध्ये उप जिल्हा अधिक्षकाचाही समावेश आहे. सराईत गुन्हेगार दुबेवर विविध 60 गंभीर गुन्हे आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलीस हे डिक्रु गावात 3 जुलैला रात्री गेले होते. यावेळी गुंडांनी केलेल्या गोळीबारात उप जिल्हा अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्सेटेबलचा मृत्यू झाला. तर इतर काही नागरिकही हल्ल्यात जखमी झाले आहेत. यामध्ये बिल्होरचेसर्कल अधिकारी देवेंद्र कुमार मिश्रा, शिवराजपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी चंद्रा यादव यांचा समावेश आहे.
मृत सहायक पोलीस निरीक्षक आणि स्टेशन इनचार्ज हे शिवराजपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. तर अनुप कुमार सिंह हे मनधन्ना पोलीस स्टेशनमध्ये सेवेत होते. सुलतान सिंह, राहुल, बबलू आणि जितेंद्र हे पोलीस कॉन्स्टेबल चौबेपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. एन्काउंटर करताना पोलीसांनी राबविलेल्या मोहिमेत दोन गुन्हेगार हे पोलिसांना शरण आले आहेत.
काय घडली होती घटना?
कानपूर जिल्ह्यातील बिकारु गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर 60 गुन्हे दाखल आहे. राज्यमंंत्र्याची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. शुक्रवारी(3 जुलै) रात्री पोलिसांचे पथक दुबेला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस येत असल्याची त्याला आधीच खबऱ्याने दिली होती. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता.
घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार छतावर बंदुका घेवून थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. दुबे हा कुख्यात गुंड असून त्याचे राजकारणी आणि पोलिसांशीही संबध आहेत, अशी माहिती मिळत आहे.