धर्मशाला - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचा फटका भारतीय चहा उद्योगाला बसला आहे. चहाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झालीय तर निर्यात जवळपास थांबलेली आहे. चहाचे कमी होत असलेले दर आणि वाढत असलेला उत्पादन खर्च यामुळे चहाच्या मळ्यांचे मालक संकटात सापडले आहेत. याचा फटका हिमाचल प्रदेशातील कागरा चहा उत्पादकांना देखील बसला आहे. लॉकडाऊननंतर हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथून होणारी चहाची निर्यात ठप्प झालीय, त्यामुळे कागरा चहा विदेशात निर्यात होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मशाळा येथील चहाच्या कारखान्यातून तयार होणारा चहा कोलकाता येथे पाठवण्यास सरकारने परवानगी दिली तर चहा उत्पादकांना काहिसा दिलासा मिळू शकतो.
लॉकडाऊन असल्याने कामगार कमी आहेत त्यामुळे चहाची तोडणी पूर्ण क्षमतेने होत नाही याचा परिणाम चहाच्या दर्जावर होत आहे. सरकारने चहा प्रक्रियेला परवानगी दिली त्याच प्रकारे चहा कोलकाता येथे पोहोचवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारकडे कागरा चहा कंपनीचे मॅनेजर अमनपाल सिंह यांनी केली आहे. चहाचे सुरुवातीचे उत्पादन ठिक आहे. मागील वर्षाप्रमाणे व्यवसाय सुरू आहे. चहा तयार होत आहे मात्र लॉकडाऊनमुळे कोलकाता येथे पोहोचेल की नाही ते सांगता येत नाही, असे अमनपाल सिंह म्हणाले.
चहाची पाने तोडण्याचे काम 20 मार्च पासून सुरू होते. मात्र, 24 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे पुर्ण क्षमतेने तोडणी होत नसल्याने चहाच्या मळ्यातील काम बंद झाले होते. यानंतर सरकारकडे चहाच्या पानांवर प्रक्रिया करण्याची परवानगी मागितली होती. 30 मार्चला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. सरकारने 50 टक्केपेक्षा जास्त कामगार कामावर हजर राहणार नाहीत, असे निर्देश दिले होते. कामगार कमी असल्याने पूर्ण क्षमतेने तोडणी होत नाही. यामुळे दर्जावर परिणाम होत आहे.
कागरा चहाची सर्वाधिक निर्यात युरोपात होत असे मात्र कोरोनामुळे संपूर्ण युरोप बंद आहे. यामुळे कागरा चहाची निर्यात यावर्षी होईल असे वाटत नाही. निर्यातीतून चांगले पैसे मिळायचे. कागरा चहाची निर्यात पुढील वर्षीच होऊ शकते. यामुळे कोलकाताच्या बाजारपेठेतच कागरा चहा विकणे हाच पर्याय समोर असल्याचे अमनपाल सिंह यांनी सांगितले.
मार्च आणि एप्रिलमध्ये चहाच्या पानांची तोडणी आणि प्रक्रिया करण्याची परवानगी मिळते. लॉकडाऊन मुळे कामगार कमी आहेत यामुळे पूर्ण क्षमतेने तोडणी होत नाही आणि याचा परिणाम दर्जावर होत आहे. मोठ्या प्रमाणावर चहाची निर्मिती करून तो साठवून ठेवण्याची देखील सोय नाही. कारखान्यात तयार होणारा चहा कोलकाता येथे लिलावाद्वारे विकला जातो. यामुळे सरकारने वाहतुकीची परवानगी द्यावी, असे अमनपाल सिंह म्हणाले आहेत.