नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई संदर्भात बेताल वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र तयार झाले आहे. या वादात कंगनाला केंद्र सरकारने सुरक्षाही पुरवली आहे. यावर आता कंगनाची आई आशा रणौत यांचीही प्रतिक्रिया आली आहे. 'महाराष्ट्र सरकारने निंदनीय काम केले आहे. आम्ही नेहमीच काँग्रेसी होतो. मात्र, संकटाच्या वेळी भाजपच माझ्या मुलीच्या मदतीस आले', असे कंगनाच्या आईने म्हटले आहे.
'देशातील सगळी जनता माझ्या मुलीसोबत आहे. ती नेहमीच सत्याच्या बाजूने उभी असते. मला तिचा गर्व आहे. आमचे घराणे पूर्वीपासून काँग्रेसी होते. आम्ही फक्त काँग्रेसलाच पाठिंबा दिला. मात्र, संकटाच्या वेळी भाजप आमच्या मदतीला आलं. माझ्या मुलीला संरक्षण पुरवल्याबद्दल मी अमित शाह यांचे आभार मानते. जर माझ्या मुलीला त्यांनी संरक्षण दिलं नसतं तर तीच्यासोबत काहीही वाईट होऊ शकलं असतं. आता आम्ही मोदीच्या बाजूला आहोत, अशी प्रतिक्रिया आशा रणौत यांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईच्या विरोधात तिच्या वकीलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे. यावर महानगरपालिकेने कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले होते. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली होती.