मुंबई - जेएनयू हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील अनेक महाविद्यालये आणि संस्था एकत्र आल्या आहेत. मध्यरात्री 12 वाजेपासून त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. गुंडांवर कारवाई करण्याची मागणीही या संस्थांनी केली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे हे आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल मुंबईकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
दिल्लीत जेएनयूच्या (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर जेएनयूत रविवारी हल्ला झाला. या हल्ल्यात आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या विरोधात मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आता विद्यार्थ्यांचे शांततेत आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत आहेत. कँडल मार्च सुरू आहे. देशभर संतापाचे वातावरण आहे. तर सोमवारी दुपारी 3 वाजता डाव्या विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे हल्ल्याविरोधात आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा - JNU : विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशा घोष यांच्यावर जीवघेणा हल्ला