नवी दिल्ली - जम्मूमधील सर्व राजकीय नेत्यांची नजरबंदी संपवण्यात आली आहे. मात्र, काश्मीरमधील काही नेत्यांना अद्यापही नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स या पक्षाच्या नेत्यांची नजरकैदैतून सुटका करण्यात आली आहे.
जम्मूमधील राजकीय नेत्यांची सुटका करण्याचा निर्णय २४ ऑक्टोबरला होणाऱ्या पंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर घेण्यात आला आहे. यामध्ये नेता देवेंद्र राणा, एस एस सलाथिया, काँग्रेसचे रमन भल्ला आणि पँथर्स पक्षाचे नेता हर्षदेव सिंह यांची नजरबंदी समाप्त करण्यात आली आहे.
दरम्यान फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांना त्यांच्या घरामध्ये नजरकैदैत ठेवण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे ५ ऑगस्टला रद्द करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील 400 नेत्यांना नजरकैदैत ठेवण्यात आले होते. नजरकैदैत असलेल्या नेत्यांनी या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.