नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाला 100 वर्षे पूर्ण झाली असून जामियात उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्रसेनानी मौलाना महमूद यांनी 29 ऑक्टोबर 1920 रोजी अलिगडमध्ये जामिया मिलिया इस्लामियाचा पाया रचला गेला. या विद्यापीठाची सुरुवात झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळामधील ब्रिटिशविरोधी जनचळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून. ही संस्था सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होती. गांधीजींच्या मदतीने 1925मध्ये या संस्थेला दिल्लीच्या करोल बाग येथे आणण्यात आले होते. जामिया सुरूच राहिली पाहिजे. ती चालवण्यासाठी भीक मागण्यास मी तयार आहे, असे महात्मा गांधी म्हणाले होते.
स्वातंत्र्यानंतर जामिया शैक्षणिक संस्था म्हणून उभारली गेली. 1962 मध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाने जामियाला एक अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले. यानंतर विविध शैक्षणिक संस्था हळूहळू विद्यापीठाशी संलग्न होत गेल्या. डिसेंबर 1988 मध्ये जामिया मिलिया इस्लामियाला संसदेच्या विशेष कायद्याद्वारे 'भारतीय केंद्रीय विद्यापीठ'चा दर्जा देण्यात आला. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचे ऐतिहासिक दस्तऐवज दालन आणि भारतीय साहित्यिकांच्या सृजनात्मक लेखनाचे दालन विद्यापीठाने उभारले आहे.
आपल्या विचारधारेवर कायम आहे जामिया -
जामियामधील माजी कर्मचारी मोहम्मद असदुल्लाह यांनी जामियामधील सर्व चढ-उतार अगदी जवळून पाहिले आहेत. मोहम्मद असदुल्लाह हे गेल्या 70 वर्षांपासून जामियाशी जोडलेले आहेत. नोकरीसाठी ते जामियाला आले होते. त्यांची संपूर्ण जडण-घडण जामियामध्ये झाली. निवृत्त झाल्यानंतरही त्याचा जामियाशी संबंध कायम राहिला. विद्यापीठाला 100 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. या गौरवशाली क्षणाचे ते साक्षीदार आहेत. जामिया एक चांगली व्यक्ती होण्याचे शिक्षण देते. या विद्यापीठाने अनेक संघर्ष पाहिले आहेत. मात्र, अद्यापही आपल्या विचारधारेवर कायम आहे, असे मोहम्मद असदुल्लाह यांनी सांगितले.