नवी दिल्ली - कोरोना प्रसारामुळे दिल्लीतील बिघडणारी परिस्थिती पाहता जामा मशीद पुन्हा बंद करावी लागेल, अशी माहिती मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी बुधवारी दिली. मंगळवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात शाही इमामचे सचिव अमानुल्ला यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाल्यानंतर बुखारी यांनी ही बाब स्पष्ट केली. देशव्यापी लॉकडाऊन उठवण्याच्या पहिल्या टप्प्यात "अनलॉक-1" चा भाग म्हणून सरकारने आणखी दोन महिन्यांनंतर 8 जूनला मशीद उघडली होती.
मंगळवारी दिल्लीत कोविड -19 चे 1 हजार 366 नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंतची दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या 31 हजार 309 वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडा 905 वर गेला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
"अमानुल्ला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना 3 जूनला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला,' असे बुखारी म्हणाले.
'राष्ट्रीय राजधानीत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या वाढत असताना ऐतिहासिक मशीद पुन्हा बंद करण्याबाबत लोकांचे मत जाणून घेण्यात आले. याबाबत लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे आपले मत मांडत आहेत. आम्ही एक किंवा दोन दिवसात ती लोकांसाठी पुन्हा बंद करू आणि काही लोकांसाठी 'नमाज' मर्यादित करू,” असे शाही इमाम म्हणाले.
'मी इतर लहान मशिदींनाही लोकांना मशिदीत न जाता घरीच राहून 'नमाज' अदा करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणूचा इतक्या वेगाने प्रसार होत असताना मशिदींत जाण्यात काय अर्थ आहे? आपण तर लॉकडाऊनमुळे रमजान आणि ईद दरम्यानही मशिदीत गेलो नाही. यामुळे लोकांच्या संरक्षणासाठी मशीद पुन्हा बंद ठेवावी लागली तरी हरकत नाही,' असे बुखारी म्हणाले.
8 जून रोजी देशभरात शॉपिंग मॉल्स आणि कार्यालये यासारख्या अनेक आस्थापनांसह धार्मिक स्थाने सुरू झाली. मात्र, बुखारी यांनी कोरोना विषाणूच्या झपाट्याने होणार्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सरकारांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे.