श्रीनगर - भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने बंकर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीमेजवळच्या १८९२ गावांमध्ये बंकर्स बांधण्यात येणार आहेत. सीमेवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू झाला असताना बंकर्समध्ये लपल्यामुळे नागरिकांचे संरक्षण होऊ शकणार आहे.
राजौरी, नौशेरा, पंजग्रेन आणि मांजाकोट येथे हे बंकर्स बांधण्यात येत आहेत. राजौरी जिल्ह्याचे विकास आयुक्त मोहम्मद एजाज असद यांनी सर्व सीमावर्ती भागांमध्ये असे बंकर्सची निर्मिती सुरू असल्याचे सांगितले आहे. बंकर बनविल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. अचानकपणे गोळीबार सुरू झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. यासाठी बंकर्सचा चांगला उपयोग होईल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
आणखी एका स्थानिक रहिवाशाने गोळीबारादरम्यान आपली घरे नष्ट होत असल्याचे सांगितले. 'अनेक लोक जखमी होण्याचे तसेच, मरण पावण्याचे प्रकारही घडतात. गोळीबाराचे आदेश मिळाल्यानंतर आमची मुले शाळेतून परत येण्याची काळजी वाटते. मात्र, आता शाळेत बंकर्स तयार केल्यामुळे मुले सुरक्षित राहतील, अशी आशा आहे,' असे ते म्हणाले.
'सीमेपलीकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते. रुग्णालयाकडे जाणारे रस्तेही खराब झालेल असतात. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अधिक वेळ लागतो. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी १८९२ बंकर्स बनवले जात आहेत,' असे सरकारी इंजिनिअर मोहम्मद हानिफ यांनी सांगितले.