नवी दिल्ली - भारतीय लष्कराने जम्मू अॅण्ड काश्मीर पीपल्स मूव्हमेंटची नेता शेहला राशिद हिचे आरोप फेटाळले आहेत. हे सर्व आरोप निराधार असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
'शेहलाने ज्या पातळीवर आरोप केले आहेत, ते सर्व निराधार आणि आम्ही ते फेटाळले आहेत. समाजविघातक व्यक्ती आणि संस्थांकडून अशा प्रकारच्या सत्यता पडताळणी न केलेल्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. जनतेला चिथावणी देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कृत्ये केली जातात,' असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एकापाठोपाठ एक अनेक ट्विटस करत शेहला हिने सैन्य दलांवर आखपाखड केली होती. 'लोक जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेविषयी कोणतेही अधिकार नसल्याचे म्हणत आहेत. त्यांना अधिकारशून्य करण्यात आले आहे. सर्व काही निमलष्करी दलांच्या हातात गेले आहे. सीआरपीएफमधील एकाची तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ठाणे अधिकारी दहशतीखाली आहेत. त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर्सही नाहीत,' अशा आशयाची ट्विटस शेहलाने केली होती.
आणखी एका पोस्टमध्ये तिने भारतीय लष्कर रात्रीच्या वेळी लोकांच्या घरात घुसत असल्याचा आरोप केला होता. 'भारतीय लष्कर रात्रीच्या घरांमध्ये घुसून तरुणांना पकडून नेत आहे. तसेच, लूटमारही करत आहे. हेतूपुरस्सर घरातील पीठ ओतून देत आहे. तांदळामध्ये तेल मिसळत आहे,' असे या पोस्टमध्ये तिने लिहिले होते.
याशिवाय, 'शोपियानमध्ये ४ जणांना लष्कराच्या शिबिरात बोलावण्यात आले. त्यांना चौकशीच्या नावाखाली जबरदस्त मारहाण करण्यात आली,' असा दावा शेहलाने केला आहे. 'या लोकांजवळ माईक ठेवण्यात आले होते. संपूर्ण परिसरात त्यांच्या किंकाळ्या पोहोचाव्यात आणि लोकांना दहशत बसावी यासाठी असे करण्यात आले. या पद्धतीने या भागात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे,' असे तिने लिहिले होते.