भोपाळ - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभाग देशभरातील ५० विविध ठिकाणांवर छापा टाकला आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांच्या विशेष अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तर, भोपाळमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्पासाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. पैशाचा गैरवापर थांबवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सक्रिय झाले आहे. त्यावरुन मध्यरात्रीपासूनच विभागाने शोधमोहिम सुरू केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष सचिव प्रविण कक्कड यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. तर, इंदूर, गोवा आणि दिल्लीच्या ३५ ठिकाणांवर ३०० पेक्षा जास्त प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शोधमोहिम राबवत आहेत.
दरम्यान भोपाळच्या प्रतिक जोशी या व्यक्तीच्या घरून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याचे विभागाने सांगितले आहे. उशीरा रात्री प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कक्कड यांच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी कुटुंबातील सर्व लोक घाबरून गेले होते. मात्र, आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे समजताच त्यांनी तपासात सहयोग केला.
प्रविण कक्कड हे राष्ट्रपती पुरस्काराने सम्मानित आहेत. २००४मध्ये त्यांनी नोकरी सोडून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भूरिया यांचे सचिव बनले होते. तर २०१८मध्ये ते कमलनाथ यांचे विशेष सचिव म्हणून कारभार सांभाळत आहेत.