बंगळुरु - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रम लँडर ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र, याचे सॉफ्ट लँडिंग न होता, तिरपे लँडिंग झाले होते. आता लँडरशी संपर्क साधण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतर संपूर्ण देशाने इस्रोला पाठिंबा दिला होता. यासाठी इस्रोने सर्व भारतीयांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानात हिंदू मुलीची हत्या, धर्मांतरण करण्यास राजी न झाल्याने कृत्य?
जगभरातील भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांना घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू, अशा आशयाचं ट्विट इस्रोने केलं आहे. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. अजूनही इस्रो आणि सर्व भारतीय विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा आहे.
विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगदरम्यान अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर त्याचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडून सतत विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रोला मदत करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही पुढे सरसावली होती. गेल्या दहा दिवसांपासून या लँडरशी संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
हेही वाचा - फारूक अब्दुल्लांच्या नजरकैदेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले...
विक्रमशी संपर्क साधण्यासाठी आता इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्याची थंडी असते. त्या वातावरणात लँडर, रोव्हर काम करण्याची शक्यता नाही. पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लँडर, रोव्हरची रचना १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.