हैदराबाद - कोरोना विषाणुची लागण झालेल्या व्यक्तिच्या खोकला, शिंक किंवा तोंडातून निघणाऱ्या छोट्याशा पाण्याच्या थेंबाद्वारेही विषाणुचा फैलाव होऊ शकतो, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंत जनावरांना लागण झाल्याच्या काही केसेस समोर आल्या आहेत. कुत्र्यांच्या तुलनेत मांजरींमध्ये कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आले आहे. पाळीव प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे काही माध्यमांनी वार्तांकन केले आहे. मात्र, पाळीव प्राण्यांतून कोरोनाची लागण मानवाला होऊ शकते की नाही यावर तज्ज्ञांनी अद्याप अधिकृत मत नोंदवले नाही.
कुठे आढळला प्रादुर्भाव?
मांजरीमध्ये विषाणू (बेल्जियम) - बेल्जियममध्ये एका पाळीव मांजरीला तिच्या कोरोनाग्रस्त मालकामुळे संसर्ग झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मांजरीच्या विष्ठेत विषाणू आढळून आल्याचे संशोधनकर्त्यांनी सांगितले. या मांजरीला श्वास घेण्यास त्रास आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते.
कुत्र्याला कोरोना (हाँगकाँग) - कुत्र्याला विषाणुची लागण होऊ शकते, असे काही अहवालातून समोर आले आहे. हाँगकाँगमध्येही असेच काही चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी एका जर्मन शेफर्ड आणि मिक्स ब्रीड कुत्र्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. हाँगकाँगच्या शेती आणि मत्स्य विभागाने या बातमीला दुजोरा दिला.
जनावरांचा अभ्यास -
रिसस मकाक या माकडांच्या प्रजातीत कोरोनाचे प्रादुर्भाव आढळला. ज्यामुळे वजनात घट, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या समोर आल्या. काही माकडांमध्ये तर न्यूमोनियाची लक्षणंही दिसून आली.
स्वत:सह आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित कसे ठेवणार?
जेव्हा तुम्ही आजार असाल तेव्हा परिवारातील दुसऱ्या व्यक्तिला आपल्या पाळीव प्राण्यांची निगा राखायला सांगा. आपल्या प्राण्यांचे चुंबन घेणे, जेवण सोबत करणे यांसारख्या गोष्टी टाळून संसर्ग रोखता येईल. आजारी असतानाही तुम्हालाचा प्राण्यांची देखभाल करायची असेल तर विशिष्ट अंतर राखा. आपले हात वारंवार धूत राहा. तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची नेहमी स्वच्छता ठेवा.
माणसांना कशी झाली लागण?
घुबडांमधून कोरोना आल्याचे मानले जाते मात्र हा विषाणू सरळ माणसांमध्ये आला नाही. आकाशात फिरणाऱ्या घुबडाने आपल्या विष्ठेच्या माध्यमातून कोरोनाचा अवशेष सोडल्याचेही सांगितले जाते. हा अवशेष जंगलात येऊन पडला. जंगली जनावर खवल्या मांजराचा या अवशेषाशी संपर्क आला आणि त्यानंतर हा विषाणू इतर जनावरांमध्ये पसरला. यानंतर संक्रमित जनावर माणसाच्या संपर्कात आला आणि अशाप्रकारे हा विषाणू मानवी शरिरात पोहोचला.
आपण का घाबरायचे नाही?
कोरोना विषाणू जनावरांमध्ये आढळत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, जनावरांमधून विशेषत: मांजरींमधून हा विषाणू माणसांमध्ये येतो, असेही सांगता येत नाही. कारण, मांजरींची संख्या माणसांइतकी नाही, अशी माहिती उमा रामाकृष्णन (असोसिएट प्रोफेसर, नेशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस) यांनी दिली.
WHO काय सांगते?
हाँगकाँगमध्ये कुत्रा आणि मांजरीत कोरोनाचा संसर्ग आढळल्यानंतरही पाळीव प्राण्यांपासून हा विषाणू माणसांमध्ये पसरतो, हे ठामपणे सांगता येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोना विषाणुची लागण झालेल्या व्यक्तिच्या शिंकणे, खोकण्यामुळे या विषाणुचा प्रसार होतो, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. वारंवार हात धूत राहण्यासह स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.