नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडॉऊन करण्यात आल्याने हातावर पोट असलेले लोक उपासमारीने त्रस्त झाले आहेत. या संकटात 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन गेल्या 7 दिवसांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक गरीब आणि गरजू लोकांना जेवण पुरवले आहे.
'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून परिसरातील स्थानिक चवीनुसार जेवण पुरवले आहे. दक्षिण भारतामध्ये लेमन राईस, पूर्वेकडील भागात खीचडी-चोखा आणि उत्तर भागात कढी-भात असे जेवण पूरवले आहे. रेल्वे विभाग गेल्या 28 मार्चपासून जेवण पुरवत असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 86 हजार 140 जणांचे पोट भरवले आहे.
रेल्वे विभागाकडून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर सारख्या अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती करण्यात आली आहे.तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष रेल्वे डब्यांमध्ये निर्माण केले आहेत. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऑल इंडिया एससी-एसटी एम्प्लॉईज असोसिएशनने आपल्या साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचा दिवसाचा २ हजार रुपये प्रमाणे ७० कोटी रुपये पंतप्रधान निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे.