बंगळुरु - आदर्शवत भारतीय संस्कृतीला लागलेला एक काळपट डाग म्हणजे “हुंडा पद्धती” असे म्हणतात. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने IFS पतीसह सात जणांविरूद्ध कब्बन पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. लग्न झाल्यापासून झालेला अत्याचार त्यांनी एफआयआरमध्ये सविस्तरपणे नमूद केला आहे.
वर्तिका कटियार या 2009 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2011 मध्ये त्याचे लग्न भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी नितीन सुभाष यांच्याशी झाले होते. नितीन दिल्ली दूतावासात कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांना दारू आणि धूम्रपानचे व्यसन लागले. व्यसनामुळे बर्याच वेळा वर्तिका आणि नितीन यांच्यात वाद होत. नितीनच्या वाढत्या व्यसनामुळे दोघांमध्ये भांडण झालं आणि यावेळी नितीनने वर्तिकाला मारहाण केली, असे वर्तिका यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
2016 मध्ये व्यसनमुक्तीवरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळी नितीनने वर्तिकाचा हात तोडला. दोघांमधील संबंध बिघडू लागले आणि भांडण वाढली. दिवाळीच्या दिवशी वर्तिकाच्या घरून काहीच भेट वस्तू न आल्याने नितीनने वर्तिकाला घटस्फोट देण्याची धमकी दिली. तसेच नितीन अनेकदा पैशांची मागणी करीत असे. नितीनच्या या वागण्यामुळे वर्तिका खूप अस्वस्थ झाली होती. अखेर त्रासाला कंटाळून तीने तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून कब्बन पार्क पोलिसांनी पती नितीन आणि तिच्या कुटुंबीयांवर हुंडा, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे.