नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात, पी. चिदंबरम यांचे कुटुंब सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. त्यासंबंधी चौकशी सुरू असताना, चिदंबरम यांच्यावरील आरोपासंबंधी पुरावे गोळा करण्याचे आव्हान कार्ती चिदंबरम याने कुटुंबियांच्या वतीने केले आहे. आपले मत व्यक्त करण्यासाठी तो सध्या ट्विटरचा वापर करत आहे.
आमचे कुटुंब एक सधन कुटुंब आहे. आम्हाला पैशाची हाव नाही, आणि पैसे मिळवण्यासाठी गैरमार्गांचा वापर करण्याचीदेखील गरज नाही. असे कार्ती याने ट्विट करत म्हटले आहे. तसेच, चिदंबरम यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे काम आणि त्यांचे योगदान हे लबाडीच्या कारस्थानाने पुसून टाकता येणार नाही. सरकारने आरोप केल्याप्रमाणे त्यांचे एखादे बँक खाते, संपत्ती वा शेअर असल्याचे सरकारने पुराव्यानिशी सिद्ध करुन दाखवावे. असे देखील चिदंबरम कुटुंबियांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ईडीच्या याचिकेवर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण न झाल्याने, पी. चिदंबरम यांना उद्यापर्यंत दिलासा मिळाला आहे. आता उद्या (बुधवारी) या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात ३०५ कोटीं रुपयांचा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत. आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.