मुंबई - योगाभ्यास हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतो. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संतुलित संगम म्हणजेच योग. भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
२७ सप्टेंबर २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी सांगितले, की योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनःशांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारिरीक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर दरवर्षी २१ जूनला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात येतो.
योगाभ्यासाची सुरुवात ही हजारो वर्षांपूर्वीच झाल्याचे मानले जाते. शंकराला पहिला योगी म्हणजेच आदीयोगी मानले जाते. स्वामी विवेकानंद यांची कीर्ती जगभरात पसरल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये लोकांनी विशेष रुची दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर कित्येक योगगुरुंच्या माध्यमातून योगाचा जगभरात प्रसार झाला. ८० च्या दशकात पाश्चिमात्य देशांमध्ये योग हा एक व्यायामप्रकार म्हणून लोकप्रिय झाला. आंतरराष्ट्रीय योग फेडरेशनच्या माहितीनुसार सध्या जगभरात ३०० दशलक्ष लोक योगाभ्यास किंवा योगासने करतात.
दरवर्षी योग दिन एका विशिष्ट थीमला म्हणजेच विषयाला अनुसरून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाची थीम आहे, "योगा फॉर हेल्थ - योगा अॅट होम". म्हणजेच, आरोग्यासाठी योग, घरच्या घरी योग! कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळेच, याआधी साजऱ्या केल्या गेलेल्या योग दिवसांप्रमाणे एकत्र येऊन योगाभ्यास न करता, लोकांना आपापल्या घरातच योगासने करण्याचे आवाहन यावर्षी करण्यात येत आहे.
हेही वाचा - जागते रहो..! बनावट ई-मेल पाठवून उत्तर कोरियाचे हॅकर्स सायबर हल्ला करण्याच्या प्रयत्नात
हेही वाचा - भारत, चीन शांततेच्या मार्गाने सीमावाद सोडवतील, नेपाळने व्यक्त केला विश्वास