हैदराबाद - जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर गुगलने जगभरातील महिलांना विशेष डूडल समर्पित केले आहे. हे डूडल यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या डूडलसच्या तुलनेत अगदी वेगळे आहे. जगभरातील प्रसिद्ध महिलांचे विचार या डूडलमध्ये मांडण्यात आले आहेत. ज्यात देशाची ख्यातनाम बॉक्सर मेरी कॉम आणि परराष्ट्र अधिकारी बेनो जेफाइन यांचे उद्धरण या डूडलमध्ये आहे.
जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम महिला दिन २८ फेब्रुवारी १९०९ मध्ये न्यूयॉर्क येथे राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात आला होता. मात्र, सोवियत रशिया येथे १९१७मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर त्याची आठवण म्हणून जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे.

गुगलने यावेळी आपल्या डूडलमध्ये महिलांसाठी खास डूडल डिजाईन केले आहे. यामध्ये जगातिल १२ भाषांमध्ये प्रेरणादायक सुविचार मांडले आहेत. त्यामध्ये भारताच्या हिंदी आणि बंगाली भाषांचा समावेश आहे. हे सुविचार देशातील २ प्रेरणादायक महिलांचे आहेत. मनिपूरच्या मेरीकॉम आणि देशातील प्रथम अंध आय. आर. एस. अधिकारी बेनो जेफाइन यांचे ते विचार आहेत.

मेरीकॉम यांचे विचार बंगाली भाषेतून मांडण्यात आले आहे. तुम्ही महिला आहात म्हणून स्वतःला कमजोर म्हणू नका, असा मेरीकॉम यांचा संदेश यातून दिलेला आहे. तर हिंदीतून जेफाइन यांचा संदेश दिलेला आहे. आम्ही इतके अनमोल आहोत की नैराष्य आमच्या हृदयात आणि मनात येऊच नये, असा जेफाइनचा सुविचार येथे देण्यात आला आहे.