नवी दिल्ली - जागतिक नागरी उड्डाण दिवस (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे) आज (7 डिसेंबर) जगभरात साजरा झाला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये हवाई प्रवासाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि नागरी उड्डाण विभागाचे महत्त्व पटवून देणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. 1994 मध्ये 7 डिसेंबरला जागतिक नागरी उड्डाण दिवस साजरा करण्याचे ठरवले. तर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेने 1996 मध्ये कॅनडा सरकारच्या मदतीने 7 डिसेंबरला जागतिक नागरी उड्डाण दिवसाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेकडून जागतिक नागरी उड्डाण दिवसासाठी प्रत्येक पाच वर्षांनंतर (2014/2019/2024/2029/) एक विशेष थीम ठरवण्यात येते. 'ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट फॉर अॅडव्हान्सिंग इनोव्हेशन' ही थीम येत्या 2023 पर्यंत ठेवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था (आयसीएओ) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रगत व सुरक्षित व्हावी ह्यासाठी अनेक उपक्रम राबवते व धोरणे ठरवण्यास मदत करते. एअरबस व बोइंग ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत. कोरोनामुळे नागरी उड्डाणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
कोरोनामुळे विमान कंपन्या पडल्या बंद -
चीनमधील करोना विषाणूचे परिणाम जगभरातील विविध देशांना भोगावे लागले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत जागतिक स्तरावरील शेकडो विमान कंपन्या बंद पडल्या आहेत. इटलीची विमान सेवा कंपनी एअर इटलीने आपले दिवाळे जाहीर केले. एअर इटलीत गुंतवणूकदारांनी मार्केटमधील परिस्थीती पाहता, हा निर्णय घेतल्याचे सांगितले. चिली देशातील एलटीएएम विमान सेवा, वर्जिन ऑस्ट्रेलिया विमान सेवा, कम्पास विमान सेवा, ट्रांस स्टेट्स विमान सेवा, मियामी एअर इंटरनेशनल विमान सेवा, फ्लाईबे विमान सेवा, एअर डेक्कन विमान सेवा, एवियनका होल्डिंग्स विमान सेवा, साउथ आफ्रिकन एअरवेज , एअर अशिया जपान विमान सेवा, या बंद पडल्या आहेत.