मुंबई - जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज 'आयएनएस विराट' मार्च २०१७ ला सेवानिवृत्त झाले होते. आज सकाळी हे जहाज तोडणी बंदरात जाण्यासाठी मुंबईच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेने रवाना झाले आहे. भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याची तोडणी होणार आहे. गेली अनेक वर्षे आयएनएस जहाज सेवा देत होते. भारताची एकेकाळी शान असलेल्या या जहाजाचा आज तोडणीसाठी शेवटचा जलप्रवास मुंबईपासून सुरू झाला.
आज सकाळी मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया'वरून सकाळी आयएनएस विराट आपल्या शेवटच्या प्रवासाकरिता रवाना झाली आहे. याची माहिती नौदलाने दिली. मे महिन्यात या जहाजाच्या तोडणीची निविदा निघाली होती. त्यामध्ये भावनगर येथील श्री राम समुहाने 38.24 कोटी रुपयांची बोली लावली व ती मान्य झाली. त्यानुसार या समुहाला हे तोडणीच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. तोडणीतून जेवढे लोखंड प्राप्त होईल, त्यातील किमान दहा टक्के लोखंड देशांतर्गत पोलाद उद्योगांना स्वस्त दरात पुरविण्याच्या अटीवर हे कंत्राट देण्यात आले आहे.
हे जहाज मुंबईहून अलंगला वाहून नेण्यासाठी (टोइंग) साधारणत: ३ दिवस लागतील. तसेच 9 ते 12 महिन्यांच्या काळात त्याचे संपूर्ण भाग सुटे करण्यात येतील, अशी माहिती श्री राम कंपनी दिली.
आयएनएस विराटविषयी -
ब्रिटिश बनावटीचे हे जहाज 1987मध्ये भारतीय नौदलात दाखल झाले होते. सी हॅरिअरसारख्या लढाऊ विमानांसह अरबी समुद्रावर दबदबा ठेवण्यात, या जहाजाचे मोलाची भूमिका बजावली. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये, यासाठी शत्रूवर वचक ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती. मार्च 2017ला हे जहाज नौदलातून निवृत्त झाले.