लखनऊ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील तुरुंगात असणारे कैदी कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) बनवत आहेत. पीपीई बनवून झाल्यानंतर ते रुग्णालयांना देण्यात येतील, अशी माहिती आनंद कुमार पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी दिली.
कैद्यांकडून बनवण्यात येणारे वैयक्तिक सुरक्षा संच लखनऊमधील बलरामपूर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली बनण्यात येत आहेत. बलरामपूर रुग्णालयाला वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) बनवून देण्यात आले आहेत. अजून 100 वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) बनवण्याचे काम सुरू आहे, एक वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) बनवण्यासाठी 600 रुपये खर्च येत असल्याचे आनंद कुमार यांनी सांगितले. कैद्यांनी यापूर्वी पाच लाख मास्क तयार केलेत.
लखनऊच्या सर्वसाधारण रुग्णालयाकडून देखील वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) ची मागणी करण्यात आल्याचे आनंद कुमार यांनी सांगितले. वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) संचाची निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य बलरामपूर रुग्णालयाच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली मान्यताप्राप्त पुरवठादाराकडून खरेदी केल्याचे आनंद कुमार म्हणाले.
उत्तर प्रदेश आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 431 कोरोनाबाधित आहेत. 32 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.