बंगळुरू : कर्नाटकमध्ये एका कोरोना रुग्णाला मृत्यूनंतरही अमानवी वागणूक मिळत असल्याचे दिसून आले आहे. दवांगेरे जिल्ह्यातील शिमोगा येथे असलेल्या मेग्गन रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर त्या महिलेच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्याऐवजी, चक्क जेसीबीने तो पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब प्रकाशात आली.
या महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तिला १४ जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केलेल्या चाचणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. १७जूनला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेसीबीच्या सहाय्याने तिचा मृतदेह पुरण्यात आला.
जिल्हाधिकारी महंतेश आर. बीलागी यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे, की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटना यापुढे होणार नाहीत यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत असेही ते म्हणाले.
हेही वाचा : छत्तीसगड - चार जणांच्या हत्येप्रकरणातील नक्षलवादी पोलिसांना शरण