हैदराबाद - तब्बल १५ दिवसांच्या उपचारांनंतर एका ४५ दिवसांच्या बाळाने कोरोनाला मात दिली आहे. तेलंगाणाच्या महबूबनगर जिल्ह्यातील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिलला गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी कोरोनाची लागण झालेले हे देशातील सर्वात लहान बाळ होते. या बाळावरील उपचार यशस्वी झाल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्य सरकारच्या माहितीनुसार, बुधवारी एकूण ३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यांमध्ये १३ लहान मुलांचा समावेश होता. यासोबतच काल राज्यात केवळ सात नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,०१६ वर पोहोचली आहे. यांपैकी ५८२ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तसेच, कोरोनामुळे राज्यात एकूण २६ लोकांचा बळी गेला आहे.
हेही वाचा : 'शेजाऱ्यांसोबत गेम्स खेळू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा' तेलंगणा पोलिसांचे आवाहन