नवी दिल्ली - भारताची लोकसंख्या 1948 साली 160 कोटी असेल, असा अंदाज संशोधकांनी लावला आहे. हे वर्ष भारताच्या लोकसंख्येचे उच्चांकी असून त्यानंतर मात्र, लोकसंख्येत उतार दिसून येईल. 2100 साली लोकसंख्या 32 टक्क्यांनी कमी होऊन सुमारे 100 कोटींवर यईल, असे लॅन्सेट या प्रसिद्ध सायन्स जर्नलच्या अभ्यासात म्हटले आहे.
लॅन्सेट जर्नलने ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2017’ च्या आकडेवारीचा अभ्यास करून अंदाज लावला आहे. या माहितीचा वापर करुन 183 देशांची लोकसंख्या आणि इतर बाबींचे विश्लेषण केले आहे. भारत, अमेरिका, चीन आणि जपान सारख्या देशांचा मत्यूदर, जन्मदर आणि स्थलांतराचे प्रमाण कसे असेल याचाही अंदाज वर्तवला आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ज्ञांसह इतर संशोधकांचे असे मत आहे की, भविष्यात भारत आणि चीनमधील काम करणाऱ्या लोकसंख्येचे (working population) प्रमाण आश्चर्यकारकपणे कमी होईल. त्यामुळे आर्थिक विकास रोडावला जाईल, आणि जागतिक शक्तीकेंद्र दुसरीकडे सरकेल. भारत, नायजेरिया, चीन आणि अमेरिका शक्तीशाली देश असतील. हे एक नवं जग असेल, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
चीनची कार्यक्षम लोकसंख्या भारतापेक्षा कमी होणार
भारतामध्ये कार्यक्षम (काम करु शकणारे) व्यक्तींची संख्या 2017 नुसार सुमारे 76 कोटी आहे. ही संख्या 2100 साली सुमारे 57 कोटींपर्यंत खाली येईल. तर चीनमधील 95 कोटी कार्यक्षम लोकसंख्या 2100 सालापर्यंत 35 कोटीवर येईल, असे अभ्यासात म्हटले आहे.
भारतात येत्या काळात चीनपेक्षा जास्त कार्यक्षम नागरिक असतील. तर भारताचा जीडीपी जगभरातून 7 व्या क्रमांकावरून 3 ऱ्या क्रमांकावर येईल. वॉशिग्टंन विद्यापीठातील संशोधक ख्रिस्तोफर मुरी यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधक करण्यात आले आहे. या शतकाच्या शेवटीपर्यंत लोकसंख्येचा आलेख वाढतच जाईल, याची शक्यता कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. जर हा अंदाज खरा झाला तर आता दिसणारा लोकसंख्याचा विस्फोट भविष्यात असणार नाही.
संशोधनातील इतर आकडेवारी -
- 2100 पर्यंत जागतिक लोकसंख्या जन्मदर 1. 66 असेल.
- जागतिक लोकसंख्या 2064 साली उच्चांक गाठेल. तेव्हा लोकसंख्या 973 कोटी असेल. तर 2100 पर्यंत जागतिक लोकसंख्या 879 कोटी असेल.
- 2100 साली जगात पाच मोठ्या देशांची लोकसंख्या किती असेल? भारत सुमारे 100 कोटी. नायजेरिया 79 कोटी, चीन, 73 कोटी, अमेरिका 33 कोटी आणि पाकिस्तान 24 कोटी.
- 2019 साली भारताचा एकूण जन्मदर 2.1 च्या खाली आहे. तर 2100 सालापर्यंत जन्मदर 1.29 असेल.
- 2100 पर्यंत नायजेरिया, पाकिस्तान, भारत आणि इंडोनेशियातील नागरिकांचे आयुर्मान सर्वात कमी असेल. हे प्रमाण 76.09 ते 79.5 च्या दरम्यान असेल.