नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याची तयारी इस्रोने केली आहे. लवकरच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मिती करणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रोकडून राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'गगनयान' मोहिमेचा पुढील भाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१५ जुलैला महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. त्याचे काऊंडाऊन सुरू झाले आहे. या घोषणेनंतर लगेचच इस्रोकडून अंतराळ स्थानकाच्या निर्मितीचीही घोषणा करण्यात आली. अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत असल्याचे डॉ. शिवन यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'भारताने २०२२ मध्ये आपल्या ७५ व्या स्वातंत्र्यवर्षपूर्तीनिमित्त अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली असेल. यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून तयारीही सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे,' असे आण्विक ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच म्हटले होते.
त्याचबरोबर चांद्रायन-२ नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे एकच पृथ्वीच्या कक्षेत पूर्णपणे कार्यरत असलेले एकच अंतराळ स्थानक आहे.