नवी दिल्ली - जगात फक्त भारतातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे आणि आपण लॉकडाऊन उठवत आहोत. यावरून लॉकडाऊनचे उद्दिष्ट्य आणि हेतू पूर्ण अपयशी ठरलेले आहे, हे स्पष्ट होते, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
लॉकडाऊनचा प्रयोग फसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः स्वीकार करतील. ते सध्या बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी समोर येऊन काम करायला पाहिजे. जनतेला त्यांच्या पंतप्रधानांना पाहायचे आहे. त्यांनी या संकटासोबत लढण्यासाठी त्यांची रणनिती सांगायला पाहिजे, असेही राहुल म्हणाले. तसेच भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरून सरकारवर टीका करणार नाही. मात्र, त्यांनी कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी त्यांची रणनिती सांगायला पाहिजे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षाचे काम सरकारवर दबाव आणणे आणि ज्या मुद्द्यावर दुर्लक्ष होत आहे, त्याची सरकारला जाणीव करून देणे आहे. त्यामुळे या संकटकाळात फेब्रुवारीपासून मी माझ्या मतावर ठाम आहे. आपण गरिबांना पैसे वाटल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली रेटींग घसरेल, असे निर्णय घेणाऱ्यांचे मत आहे. मात्र, गरिबांना पैसा वाटल्यास देशाला आतून बळकटी येईल, असेही राहुल म्हणाले.
लॉकडाऊन उघडल्यामुळे विषाणूची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्यासाठी घाई करायला नको, असेही ते म्हणाले. देशात आधीच बेरोजगारीची समस्या होती. आता या साथीच्या रोगामुळे त्याच्यावर गंभीर परिणाम झाला आहे. मेक इन इंडियासारख्या उपक्रमांचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे लघु अन् मध्यम उद्योगांना पैशांचा पुरवठा करण्याची गरज आहे. असे न केल्यास हे धोकादायक ठरेल, असेही राहुल गांधी म्हणाले.
राज्यांना केंद्र सरकारच्या पाठिंब्याची गरज -
केंद्र सरकारच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मात्र, तो मिळत नसल्याने राज्य सरकार विषाणूवर मात मिळवू शकत नाही. दुर्गम भागापेक्षा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांना या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे, असेही राहुल म्हणाले.