नवी दिल्ली - इराणने भारताला मोठा झटका दिला असून चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताने जागतिक पातळीवर अब्रू गमावली आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली असून आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचेही म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की भारत जागतिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी आपली ताकद आणि सन्मान गमावत आहे. भारत सरकारला काय करायचे आहे, जागतिक पातळीवर कोणती ओळख निर्माण करायची आहे, याची काहीच कल्पना नाही.

हेही वाचा - बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.. उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल
काय आहे चाबहार प्रकरण?
इराणने भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून दूर सारत चीनसोबत जवळीक साधली आहे. प्रकल्पासाठी निधी देण्यास दिरंगाई करत असल्याचे कारण देत इराणनने भारताला या प्रकल्पातून काढून टाकले आहे. दरम्यान, इराणने चीनसोबत आर्थिक आणि राजकीय सहकाऱ्याचा करार मंजूर केला आहे. त्यामुळे भारताची राजनैतिक स्तरावर पिछेहाट झाली आहे.
चार वर्षांपूर्वी भारत आणि इराणने चाबहार बंदर ते झिदानपर्यंत रेल्वेलाइन उभारण्याच्या प्रकल्पावर सह्या केल्या होत्या. हा मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेलगतच्या भागातून जाणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला रणनितीक आणि व्यापारीदृष्या महत्त्व होते. मात्र, आता इराणने हा प्रकल्प एकट्यानेच पूर्ण करण्याचे ठरवले आहे.