तिरुवअनंतपुरम - प्रांजल पाटील, या देशातील पहिल्या अंध महिला आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नुकताच केरळची राजधानी असलेल्या तिरुवअनंतपुरमच्या उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
२०१७च्या नागरी सेवा परिक्षांमध्ये देशातून १२४वा क्रमांक पटकावत प्रांजल या आयएएस झाल्या होत्या. २०१८मध्ये त्या एर्नाकुलमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. आता त्या तिरुवअनंतपुरमच्या उपजिल्हाधिकारी आहेत. वयाच्या सहाव्या वर्षीच आपली दृष्टी गमावलेल्या प्रांजल या केवळ दुसऱ्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या.
प्रांजल यांच्या स्वागतासाठी तिरुवअनंतपुरमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमाला विविध अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण जिल्ह्यासाठी हा शुभ क्षण अगदीच अविस्मरणीय आहे, असे मत सामाजिक न्याय विभागाचे विशेष सचिव बिजू प्रभाकर यांनी व्यक्त केले. तर, तिरुवअनंतपुरमचे जिल्हाधिकारी के. गोपालकृष्णन यांनी प्रांजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रांजल यांची कामकाजात मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
हेही वाचा : 'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' शाळेच्या परीक्षेतील प्रश्न