हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे गरजेचे आहे. कोरोना साथीच्या सामना करण्यासाठी चाचण्या करणाऱ्या इतर देशांच्या तुलनेत भारताचा चाचणी दर हा फारच कमी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन कोरोना चाचण्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाल्या. जर्मनी, तैवान, दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेसारख्या काही देशांच्या तुलनेत भारताचे एकूणच चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचे स्वामीनाथन म्हणाल्या.
प्रत्येक सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रती दशलक्ष लोकांमागे चाचणी दर काय आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांचा दर काय आहे, यासारखे मापदंड असणे आवश्यक आहे. अशा क्षणी जर तुमचा पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे, तुमचे चाचणी प्रमाण कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चाचणी करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डब्ल्यूएचओने अनेकदा सांगितले आहे. जोपर्यंत चाचण्या करत नाही. तोपर्यंत कोरोना रुग्ण समोर येणार नाहीत. त्यासाठी आपण चाचण्या करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
येत्या 12 महिन्यात देशातील सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पाऊले उचलली पाहिजेत. काही देशांनी पहिल्या टप्प्यात सुशासन, शिस्त, वैज्ञानिक ज्ञानावर आधारित चांगले धोरणात्मक नियोजन, सरकार आणि लोक यांच्यातील चांगला संवाद या गोष्टीमुळे कोरोनावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले आहे. फक्त चाचण्या करूनही काही होणार नाही. त्यासाठी बाधित रुग्णांना क्वारंटाईन करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
27-28 लसी ह्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहेत. तर आणखी 150 लसी प्री-क्लिनिकल टेस्टमध्ये होत्या. किमान 5 लसी चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये प्रवेश करीत आहेत. पुढील काही महिन्यांत लसींच्या सुरक्षितता आणि कार्यक्षमतेबद्दल माहिती होईल, असे त्यांनी सांगितले.