नवी दिल्ली - भारतीय नौदल शक्तिशाली बनवण्यासाठी नौदलाने नव्याने नियोजन आखले आहे. यामध्ये १८ पारंपारिक पाणबुड्यांबरोबर ६ आण्विक पाणबुड्या बनवण्याचे विचाराधीन आहे.
सद्यस्थितीत नौदलाकडे पारंपरिक पाणबुड्या श्रेणीमध्ये १५ आणि फक्त एक आण्विक पाणबुडी उपलब्ध आहे. या आण्विक पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र असून ती रशियन बनावटीची आहे. भारताने भाडेतत्त्वावर ती वापरण्यास घेतली आहे. संसदेच्या संरक्षणसंबधी समितीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात नौदलाची ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
हेही वाचा- 'उत्तर प्रदेश सरकारने अमानुषतेच्या सर्व सीमा पार केल्या', प्रियांका गांधींचे टि्वट
नियोजित पाणबुड्या स्वदेशी तंत्रज्ञान आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने बनवण्यात येणार आहेत. पारंपरिक श्रेणीमध्ये नौदलाकडे सध्या जर्मन बनावटीच्या, रशियन बनावटीच्या आणि फेंच बनावटीच्या पाणबुड्या उपलब्ध आहेत. मागील १५ वर्षात फक्त २ पारंपरिक पाणबुड्या नौदलाकडे नव्याने आल्या आहेत. यामध्ये आयएनएस खांदेरी आणि आयएनएस कलावरी या स्कॉर्पीयन गटातील पाणबुड्यांचा समावेश आहे, असे संरक्षक समितीच्या अहवालात म्हटले आहे.
सध्या नौदलाकडे असलेल्या १५ पारंपरिक पाणबुड्यांपैकी १३ पाणबुड्या १७ ते ३१ वर्ष जुन्या आहेत. नौदल 'प्रोजेक्ट ७५' अंतर्गत आणखी ६ पारंपरिक पाणबुड्या बनवण्याचा नौदलाचा प्रयत्न आहे, यामध्ये परदेशी कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
हेही वाचा- 'देशातील युवकांना अराजकता आणि अव्यवस्थेविरूद्ध चीड'