नवी दिल्ली - भारतीय लष्कराने सोमवारी एका ट्विटमधून 'हिममानव' अस्तित्वात असल्याचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारच्या व्यक्तीला भारतीयांनी 'यती' असे नाव दिले असून त्याविषयी अनेक कल्पना आहेत. आता भारतीय लष्कराने अशा महाकाय व्यक्तीच्या पाऊलखुणा असलेली छायाचित्रे ट्विटरवरून शेअर केली आहेत. यामुळे 'खरोखरच हिममानव अस्तित्वात असेल काय,' अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
भारतीय लष्कराने त्यांच्या पर्वतारोहण अभियान दलाने ९ एप्रिलला मकालू बेस कॅम्पजवळ ३२x१५ इंचांच्या पाऊलखुणा पाहिल्या. त्याची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. रहस्यमयी हिममानव 'यती'च्या पावलांच्या या खुणा असतील का, याविषयी चर्चा आहे. याआधी हा रहस्यमयी आणि पटकन निसटून निघून जाणारा हिममानव मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये पाहण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
अशा प्रकारची महाकाय व्यक्ती अस्तित्वात असल्याचे दंतकथा आहेत. मात्र, काही बौद्ध भिक्खूंनीही त्याला पाहिल्याचे दावे केले आहेत. तसेच, त्याच्याविषयी तऱ्हतऱ्हेचे अंदाज लावले जातात. शास्त्रज्ञांना अद्याप असे स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत.
'यती' म्हणजे काय?
यती हा जगातील सर्वांत रहस्यमयी प्राण्यांपैकी एक आहे. याची गोष्ट काही ठिकाणी १०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. यती हा मनुष्य नसून तो ध्रुवीय आणि भूऱ्या रंगाच्या अस्वलाचा 'क्रॉस ब्रीड' म्हणजेच 'संकर' असल्याचे सांगितले जाते. हा एक विशालकाय जीव असून ते माणसाप्रमाणे २ पायांवर चालत असल्याचे काही वैज्ञानिकांचे मत आहे. मात्र, त्यांच्यात एकमत नाही.