द्रास - भारताने २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानचा पराभव करत कारगिलवर विजय मिळवला होता. यावेळी ऑपरेशन विजय राबवत लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावले होते. येत्या २६ जुलैला सबंध देश २० वा कारगिल विजय दिवस साजरा करणार आहे. या दिनानिमित्त लष्कराने बुधवारी बोफोर्स तोफांचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनात सीमेवर तैनात करण्यात येणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणे ठेवण्यात आली होती.
बोफोर्स तोफा १९८० दशकाच्या मध्यावधीत लष्कराच्या 'आर्टिलरी रेजिंमेंट'मध्ये दाखल करण्यात आल्या. या तोफांद्वारे कमी आणि जास्त उंचीवरील दोन्हीही लक्षे भेदण्याची क्षमता असल्याचे बोफोर्स तोफा विभागाचे प्रमुख कर्नल हरिमरंजित सिंग यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १५५ मि. मि बोफोर्स तोफांची अत्याधुनिक वैशिष्ट्यै ही सांगितली.
कारगिल युद्ध जिंकण्यामध्ये बोफोर्स तोफांचा मोठा वाटा होता. या तोफांच्या वापरामुळे भारताला युद्धामध्ये विजय मिळवणे सोपे गेले. प्रदर्शनावळी सीमेवर वापरण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांबद्दल नागरिकांना इत्यंभूत माहिती देण्यात आली. तसेच शस्त्रांचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिकही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे शस्त्रांना जवळून अभुवण्याची संधी नागरिकांना मिळाली.
लष्करातर्फे २० व्या कारगिल विजय दिवसाच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी द्रास भागामध्ये कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. यावेळी ते युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.