हैदराबाद - भारतीय सेना अधिकारी मेजर सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. तसेच त्या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील, असेही ते म्हणाले. सुमन या संयुक्त राष्ट्र मिशनसाठी सूदानमध्ये तैनात होत्या. नुकतेच त्यांनी हे मिशन पूर्ण केले आहे.
मेजर सुमन गावनी यांनी आपल्या पाठिंब्याने, मार्गदर्शनाद्वारे आणि नेतृत्वातून संघर्षाच्या परिस्थितीत लैंगिक हिंसाचाराचा प्रतिकार करून युएन शांती सैनिकांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यास मदत केली, असे संयुक्त राष्ट्र संघाने मंगळवारी पुरस्कार जाहीर करताना सांगितले. सुमन यांनी दक्षिण सुदानमधील सरकारी सैन्यांना प्रशिक्षण दिले, असेही यात नमूद केले आहे.
गावनीसोबतच ब्राजीलच्या नौदल अधिकारी कमांडर कार्ला माँटेरो डी कॅस्ट्रो अराझो यांनाही हा पुरस्कार मिळणार आहे. मेजर सुमन या समाराहोसाठी न्यूयॉर्कला जाणार होत्या. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना आता एका ऑनलाईन समारोहाद्वारे हा पुरस्कार दिला जाणार आहे. २९ मे रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.