नवी दिल्ली - भारत-चीन सीमावाद सुरु असतानाच लडाखमधील डोंगराळ भागात निगराणी राखणे लष्करासाठी गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास विभागाने(डीआरडीओ) लष्कराला अत्याधुनिक ड्रोन दिले आहे. त्यामुळे उंचावरील भागात बारकाईने लक्ष ठेवण्यास लष्कराला मदत होणार आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर वाद सुरु असताना नियंत्रण रेषेवर अचुकपणे निगराणी राखणाऱ्या ड्रोनची लष्कराला गरज होती. ही गरज ओळखून डीआरडीओने ‘भारत’ हे ड्रोन लष्कराला दिले आहे. चंदीगडमधील डीआरडीओच्या विभागाने हे ड्रोन तयार केले असून जगातली सर्वात जास्त चपळ आणि हलक्या वजनाचे असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे आर्टिफिशियल बुद्धिमत्तेवर (कृत्रिम बुद्धिमत्ता) हे काम करते.
ड्रोनमध्ये शत्रू आणि मित्र ओळखण्याची क्षमता आहे. या ड्रोनच्या वापरामुळे लष्कराच्या निगराणीमध्ये आणखी अचुकता येणार आहे. अत्यंत थंड हवामानातही ते काम करु शकणार आहे. भविष्यात आणखी तीव्र हवामानात काम करण्याची क्षमता डीआरडीओकडून विकसित करण्यात येत आहे. रिअल टाईम व्हिडिओ ट्रान्समिशन करण्याची क्षमता यामध्ये आहे. तसेच अंधारात सुद्धा ते काम करु शकणार आहेत. घनदाट जंगलात लपून बसलेल्या शत्रुलाही ड्रोन ओळखू शकणार आहे. त्यामुळे भारताच्या सीमेवरील क्षमतेत वाढ होईल, असे सुत्रांनी सांगितले.