नवी दिल्ली - आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे लष्करी विमान बेपत्ता झाले आहे. विमान अरुणाचल प्रदेशातील मेनचुका विमानतळाकडे निघाले होते. विमानात हवाई दलाचे १३ कर्मचारी आहेत. ३ जून रोजी १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून या विमानाचा संपर्क तुटला. मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे. हे विमान बेपत्ता होऊन २४ तास उलटले आहेत. तरीही, अद्याप या विमानाचा शोध लागलेला नाही. शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.
या विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाईदलाकडून सुखोई-३० कॉम्बॅट आणि सी-१३० विशेष ओपीएस विमाने पाठविली आहेत. ही विमाने आएएफ-३२ संपर्क तुटलेल्या ठिकाणावर जाऊन शोध घेत आहेत. रशियन बनावटीचे आयएएफ एएन-३२ हे विमान १९८० साली हवाई दलात दाखल करण्यात आले होते. यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाद्वारे बदल करण्यात येत होते. परंतु, सद्या झालेल्या बेपत्ता विमानात नवीन बदल करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत ट्वीट करून माहिती देताना लिहिले, की 'मी एअर मार्शल राकेश सिंह भादौरिया यांच्याकडून बेपत्ता विमान घटनेची माहिती मागवली आहे. सद्यपरिस्थितीबद्दल भारतीय वायुसेना काय पावले उचलत आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. एअर मार्शलनी मला परिस्थितीबद्दल सर्व माहिती दिली आहे. मी विमानातील सर्व कर्मचारी सुखरूप असावेत', अशी प्रार्थना करतो.