नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी २१ दिवस देश बंद ठेवण्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानुसार या आपात्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासंबधित सूचना गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत.
या सेवांवर बंदी घातली जाईल -
- लॉकडाऊन दरम्यान सर्व रस्ता, रेल्वे आणि हवाई या वाहतूक सेवा बंद राहतील.
- किराणा आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
- हॉटेल, धार्मिक स्थळांसह सर्व शैक्षणिक संस्था देखील बंद राहतील.
- मॉल, जीम, स्पा, स्पोर्ट्स क्लब यासारखी सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील.
या सेवा सुरू राहतील -
- बँका, विमा कार्यालये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम सुरु असणार आहेत.
- रुग्णालये, नर्सिंग होम, पोलीस, अग्निशमन केंद्रे, एटीएम कार्यरत राहतील.
- ई-कॉमर्सद्वारे औषध वितरण, वैद्यकीय उपचार सुरू राहतील.
- पेट्रोल पंप, एलपीजी पंप, गॅस रिटेल खुले असतील.
- इंटरनेट, प्रसारण आणि केबल सेवा सुरू राहील.
- अंत्यसंस्कारात 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही.
- लॉकडाऊन लागू करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱयाद्वारे कार्यकारी दंडाधिकारी तैनात केले जातील.
- शासकीय निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास किंवा चुकीची माहिती पसरविल्यास एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.
कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूचा बळी आज तामिळनाडूमध्ये गेला आहे. मदुराई येथील राजाजी रुग्णालयात एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून 562 वर आकडा पोहचला आहे. तर पुण्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. या दोघांवरील उपचार यशस्वी झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. कोरोनाच्या रुग्णांची उपचारांनंतर खात्रीसाठी दोनवेळा तपासणी करण्यात येते. या दोनही तपासण्यांमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.