नवी दिल्ली - भारत ब्रिटनमध्ये ६ जानेवारीपासून विमान सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने विमानसेवा खंडीत करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा ही सेवा सुरू होणार आहे.
दरम्यान, ब्रिटनहून भारतात येणारी विमाने दोन दिवस उशीरा म्हणजेच ८ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात ३० फ्लाईट सुरू राहणार आहेत. यातील १५ विमाने भारतीय कंपन्यांची तर १५ ब्रिटनचे असतील, असे नागरी उड्डाण मंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितले. २३ जानेवारीपर्यंत हे वेळापत्रक राहणार असून त्यानंतर पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
२३ डिसेंबरापासून बंद होती विमानसेवा
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर दोन्ही देशांतील विमान सेवा बंद करण्यात आली होती. हा नवा कोरोचा विषाणू जास्त घातक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. भारतातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांना विगलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहेत. तसेच लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणीही घेण्यात येत आहे.
अनेक देशांत आढळला कोरोनाचा नवा विषाणू
ब्रिटनहून भारतात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाकडून मिळवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचाही शोध सुरू आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण डेनमार्क, नेदलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्पेन, स्वित्झलँड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर या देशांतही आढळून आले आहेत. नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २३ पर्यंत भारतात ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी आले आहेत. या सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र, यातील अनेक प्रवाशांचा ठावठिकाणा लागत नाही.