नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात सध्या 4 लाख कोरोनाग्रस्त आहेत. येत्या 1 जुलैपर्यंत ही संख्या 6 लाख होऊ शकते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतामध्ये योजनांची योग्य अंमलबजावणी झाली नाही, असे मत अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीतील भारतीय वंशाच्या अव्वल संशोधक भ्रामर मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
भारताने आपल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 5 टक्के लोकांची चाचणी केली आहे. 6 दशलक्ष चाचण्यांपासून 54 दशलक्ष चाचण्यांपर्यंत पोहचण्यासाठी बराच वेळ लागेल. म्हणून, आरटी-पीसीआर चाचणीसाठी पर्यायांची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमुद केले.
9 आठवड्यांचा लॉकाडाऊन पाळूनही कोरोना प्रकरणांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. इतर देशांमध्ये 3 ते 4 आठवड्याच्या लॉकडाऊन काळात कोरोनाचे संक्रमण कमी झाले. मात्र, भारताता ती स्थिती नाही. राज्यस्तरीय विषमता हे याचे सर्वांत मोठे कारण आहे, असे त्या म्हणाल्या.
कोरोना प्रकरणांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी आपल्याकडे रणनीती आवश्यक आहे. जर मुंबईतील धारावी झोपडपट्टीच प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशस्वी व सामाजिक अंतर राबवले जात असेल, तर मला खात्री आहे की हे इतरत्रही होऊ शकते, असे त्या म्हणाल्या. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात धुणे आणि केवळ आवश्यक गोष्टींसाठी बाहेर जावे, असे मुखर्जी म्हणाल्या.
ही एक मोठी प्रकिया आहे. जेव्हा लॉकडाऊन काढले जाईल, तेव्हा रुग्ण वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूपच ठोस योजनांची आवश्यकता आहे. जेणेकरुन रुग्णालयातील यंत्रणा भंग होऊ नये आणि मृतांचा आकडा वाढू नये. कोरोनावर लॉकडाउन हा एक इलाज नाही, किंवा औषधही नाही. आपण सतत लॉकडाऊनच्या ढालीमागे लपू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास आणि प्रत्येक नागरिकाने खबरादारी बाळगल्यास कोरोनापासून नक्कीच बचाव करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.