नवी दिल्ली - सरकारी कंपनी एमएमटीसीने कांद्याच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी तुर्कीकडून 11 हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. याआधी इजिप्तमधून 6 हजार 90 टन कांदा ऑर्डर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील महिन्यात 1.2 लाख टन कांदा आयातीला मंजुरी दिली आहे.
देशातील सर्वच भागांमध्ये कांद्याच्या किरकोळ विक्रीच्या किमती 75 ते 120 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचल्या आहेत. उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. यामुळे सरकारने कांदा आयातीसह अनेक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कांदा निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे कांदा साठवणीची कमाल सीमा निश्चित करण्यात आली आहे. कांद्याच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. यात अर्थमंत्री, उपभोक्ता मंत्री, कृषी मंत्री आणि रस्ते परिवहन मंत्री यांचा समावेश आहे.