नवी दिल्ली - देशभरामध्ये जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, तसे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आज(शुक्रवार) अखेरपर्यंत म्हणजे 17 एप्रिलपर्यंत देशभरात 3 लाख 18 हजार 449 नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे, अशी माहिती आयसीएमआर संस्थेने दिली आहे.
एकूण वैद्यकीय नमुने 3 लाख 35 हजार 123 नागरिकांचे घेण्यात आले आहेत. त्यातील 3 लाख 18 हजार 449 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुरुवातील भारतात कोरोना चाचणी घेण्याचे प्रमाण कमी होते मात्र, नंतर चाचणी घेण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे 24 ते 25 व्यक्तींची चाचणी घेत असल्याचे काल आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणू भारतात 3 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आहे. एवढ्या लवकर विषाणूमध्ये म्युटेशन म्हणजेच जनुकीय परिवर्तन होणार नाही. आता जी लस कोरोनावर तयार केली जाईल, ती भविष्यातही कामी येईल, असे आयसीएमआरचे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.