नवी दिल्ली-वर्ल्डोमीटरनुसार रविवारी भारतातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या 6 लाख 90 हजारांवर पोहोचली. यामुळे भारत आता जागतिक स्तरावर कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरनुसार अमेरिका, ब्राझील भारताच्या पुढे आहेत तर रशिया चौथ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेत 29 लाख 54 हजार 999 कोरोना रुग्ण संख्या आहे. ब्राझीलमध्ये 15 लाख 78 हजार 376 आणि रशियात 6 लाख 81 हजार 251 रुग्ण संख्या असल्याची आकडेवारी वर्ल्डोमीटरने दर्शवली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या आकडेवारी नुसार भारतात कोरोनाबाधित रुग्णसंख्या 6 लाख 90 हजार 349 वर पोहोचलीय. देशात 19683 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील जॉन होपकिन्स विद्यापीठाच्या सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार रशियाची कोरोना रुग्ण संख्या 6 लाख 80 हजार 283 आहे. तर भारताची रुग्णसंख्या 6 लाख 73 हजार 165 आहे.
भारताच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार सकाळी 8 वाजेपर्यंत एका दिवसात 24 हजार 850 रुग्ण वाढले आहेत. भारतातील रुग्ण संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली.रविवारी 613 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या 19268 वर पोहोचली.
सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारच्या पटीत कोरोना रुग्णांची वाढ भारतात होत आहे. 4 लाख 9 हजार 82 जण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 44 हजार 814 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 60.77 वर पोहोचला आहे.